Thane: स्विगीचा डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून ठाण्यातील कुटुंबाला लाखो रुपयांना लुटले; गुन्हा दाखल, तपास सुरु
Swiggy (Photo Credits: PTI)

फूड डिलिव्हरी अॅप स्विगीचा (Swiggy) डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून एका तरुणाने ठाण्यातील (Thane) एका कुटुंबाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तक्रारीनंतर ठाणे गुन्हे शाखेसह नौपाडा पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. या तरुणाने कुटुंबाच्या घरात घुसून 15 वर्षीय तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या आईचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुटली. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला 39 वर्षीय असून ती ठाण्यातील पाचपाखाडी येथील रहिवासी आहे. ती, तिचा 15 वर्षांचा मुलगा आणि बांधकाम व्यवसाय करणाऱ्या तिच्या नवऱ्यासोबत राहते.

पोलिसांना दिलेल्या निवेदनात, तिने कथितरित्या ही घटना 9 मार्च 2022 रोजी दुपारी 12:45 ते 1:10 च्या दरम्यान घडल्याचे सांगितले. त्यावेळी तक्रारदार आणि तिचा मुलगा घरात होते. 9 मार्चला दुपारी एका 20 वर्षांच्या मुलाने त्यांचा दरवाजा ठोठावला. आपण स्विगी फूड अॅपवरून असल्याची बतावणी करत डिलिव्हरीसाठी आलो असल्याचे त्याने सांगितले. मात्र पीडितांनी आपण कोणत्याही जेवणाची ऑर्डर दिली नसल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपीने घरात प्रवेश करण्यासाठी पाण्याचा ग्लास मागितला. महिला पाणी आणण्यासाठी गेली, तर तिचा मुलगा बाहेर वाट पाहत होता. हा मुलगा कराटेचा सराव करतो. त्याला या तरुणाकडे पाहून काहीतरी संशयास्पद असल्याची शंका आली. त्याने घरातील चाकू आणला आणि आरोपीला धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्याच्याकडून चाकू हिसकावून घेतला आणि त्यानंतर आईला धमकावून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम काढून घेतली. महिलेनेही जीवाच्या भीतीने सर्व गोष्टी दिल्या. (हेही वाचा: मुंबई विद्यापीठ परिसरात बॉम्बस्फोटाची खोटी धमकी; सांताक्रूझ येथील एका 31 वर्षीय व्यक्तीला अटक)

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने सोन्याचे व हिऱ्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा साधारण 10 लाखाचा ऐवज घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. महिलेच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 452, 392 आणि 506 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नौपाडा पोलीस  आणि ठाणे गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की, आरोपीने मास्क आणि टोपी घातलेली होती. तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.