
कलिना येथील मुंबई विद्यापीठ (Mumbai University) परिसरात बॉम्बस्फोटाची खोटी धमकी (Hoax Bomb Threat) दिल्याप्रकरणी, सांताक्रूझ (पूर्व) येथील एका 31 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बुधवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सुरज जाधव असे आरोपीचे नाव असून त्याने बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि मुंबई विद्यापीठाचा परिसर 10 मिनिटांत उडवून देण्याची धमकी दिली.’
त्यानंतर स्थानिक बीकेसी पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने इतर यंत्रणांनाही सतर्क राहण्यास सांगितले. मात्र तपासणीदरम्यान कोणताही बॉम्ब आढळून आला नाही. तपासानंतर पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचले की, ही बॉम्बची धमकी खोटी होती. त्यानंतर दुसऱ्या पोलीस पथकाने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. अवघ्या दोन तासात पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला. जाधव हा दारुडा असून, दारूच्या नशेत त्याने हा गुन्हा केला असावा, असे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai: पुण्यापाठोपाठ मुंबईत सेप्टिक टँक साफ करताना अपघात, गुदमरून तीन जणांचा मृत्यू)
पोलिसांनी सांगितले की, जाधवचे नुकतेच विद्यापीठातील एका गार्डसोबत भांडण झाले होते. तसेच त्याला आपल्या पत्नीशीही समस्या होती. त्याची पत्नी त्याच परिसरात काम करते, अशाप्रकारे या दोघांना त्रास देण्यासाठी त्याने हा कॉल केला होता. जाधव याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला गुरुवारी वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याला शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.