गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणांवरून एका तरूणाची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेलुबाजार (Shelu Bazar) येथे सोमवारी (1 मार्च 2021) रात्री घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकणी स्थानिक पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारचाकी गाडी लावण्यावरून मृत तरूण आणि आरोपीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. याचदरम्यान आरोपीने तरूणाच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली.
विठ्ठल अशोक पानभरे असे मृत तरूणाचे नाव आहे. तर, कुलदीप गाढवे असे आरोपीचे नाव आहे. या दोघांत चारचाकी गाडी लावण्यावरून सोमवारी रात्री किरकोळ वाद झाला. या वादाते हाणामारीत रुपांतर झाले. त्यावेळी कुलदीपने विठ्ठलच्या पोटात चाकू भोसकला. यात विठ्ठल गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत विठ्ठलच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती न्युज 18 लोकमतने दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai: कॉटन ग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान एका महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल
विठ्ठल हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आहेत. त्याच्या मृत्युनंतर पानभरे कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. तर आरोपी कुलदीप हा विवाहित असून त्याला दोन लहान मुले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्याचे नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.