भाजप आणि शिवसेना महायुतीचंच सरकार पुन्हा महाराष्ट्रात येणार असं जरी अनेक बड्या नेत्यांकडून बोलण्यात येत असलं तरी त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब अद्याप तरी झालेलं नाही.
मुख्यमंत्री पदावरून सुरु झालेले शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधील मतभेद अजून विकोपाला जाऊ शकतात असे वाटते. कारण सकाळ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार भाजप पक्षाने गृह, वित्त, महसूल आणि नगरविकास ही चारही महत्त्वाची खाती शिवसेनेला न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजप स्वतःकडे 26 खाती ठेवणार आहे तर शिवसेनेला फक्त 13 खाती देण्यात येतील व मित्रपक्षांना फक्त 4 खाती दिली जातील अशीही माहिती देण्यात आली आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकारांची भेट घेतल्यावर तेच पुढचे 5 वर्षही मुख्यमंत्री असतील अशी माहिती एका अनौपचारिक बैठकीत दिली. आणि याचे प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने भाजप सोबत असलेल्या बैठकीत हजेरी न लावण्याचे ठरवले.
तसेच दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांना भीती दाखवण्याचे अनेक प्रयत्न देखील सुरु आहेत. काल भाजपचे खासदार संजय काकडे यांनी शिवसेनेचे 56 पैकी 45 आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले तर दुसरीकडे शिवसेनेचे अब्दुल सत्तर यांनी भाजपचे 50 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत असे सांगितले.
देवेंद्र फडणवीस होणार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; शुक्रवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ?
त्यामुळे आता येणारा काळच ठरवेल की नक्की नवे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे असतील आणि शिवसेनेकडे कोणती खाती देण्यात येतील.