शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे: चंद्रकांत पाटील
Maharashtra BJP Chief Chandrakant Patil (Photo Credits: Twitter/ ANI)

'आजके शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या प्रकाशनापासून राज्यातील सत्तेत असणारे पक्ष व विरोध पक्ष यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांना या बद्दल प्रतिक्रिया देण्यास सांगितली होती. याला प्रत्युत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी शिवसेनेने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर एक पत्र टाकत त्यात लिहिले आहे की, "श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही." तसेच शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

संजय राऊत यांना लक्ष्य करत ते म्हणाले, “राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे, हेच संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून दिसत आहे. शिवसेना या उद्दाम सवालाशी सहमत आहे का, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल”.

देशी लेनने शिवरायांची अस्मिता पणाला लावली आहे, सुधीर मुनगंटीवार यांच्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदीच देतील: शिवसेना

“माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी शिवसेनेवर आणि विशेषतः संजय राऊत यांच्यावर केलेली टीका राऊत यांना झोंबली असेल तर ते समजू शकते. त्यांना शक्य असेल तर त्यांनी छत्रपतींच्या सवालांना उत्तरे द्यायला हवी होती. पण छत्रपतींना उत्तर देता येत नाही तर थेट त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचेच लक्षण आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे आहे," असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.