''पंतप्रधानपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत शपथेवर खोटे बोलणारे विराजमान होणार्‍या देशात निवडणूक सुधारणा व आचारसंहिता म्हणजे एक थोतांड''
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

'पंतप्रधानपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत शपथेवर खोटे बोलणारे विराजमान होणार्‍या देशात निवडणूक सुधारणा व आचारसंहिता म्हणजे एक थोतांड म्हणायला हवे, अशा थेट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. तसेच, लोकशाहीत थापा मारणे हा निवडणूक जिंकण्याचा एक मार्ग बनला आहे. ‘ज्याची लाठी त्याची म्हैस’,‘ज्याच्या हाती ससा तोच पारधी’ यापासून निवडणूक आयोगही मुक्त नाही, असा आरोप करत ‘निवडणूक गैरव्यवहार करणार्‍यांना चाप लावू’,या निवडणूक आयोगाच्या घोषणेवर ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ठाकरे यांनी टीकाबाण सोडले आहेत.

स्वतः मुख्यमंत्री मांडीवर ‘थापा’ मारत मैदानात उतरले व थापांचा पाऊस पाडून निघून गेले.

पैसा फेका आणि निवडणुका जिंका असेच सगळे सुरू आहे. हे सर्व थांबविण्याची धमक निवडणूक आयोगात आहे काय? असेल तरच निवडणूक सुधारणांवर बोला. निवडणुकांतील पोकळ आश्वासने हा गुन्हा ठरणार असेल तर ‘‘निवडणूक गैरव्यवहार करणार्‍यांना चाप लावू’’ ही निवडणूक आयोगाची घोषणाही ‘पोकळ आश्वासन’ ठरू नये. नाहीतर गप्प बसावे व जे जे सुरू आहे ते ते उघड्या डोळ्यांनी पाहावे. सहनशीलतेचा अंत होईल तेव्हा जनताच बंड करील!, असा इशारा देतानाच 'लोकशाहीत थापा मारणे हा निवडणूक जिंकण्याचा एक मार्ग बनला आहे. विधानसभा-लोकसभा निवडणुकांतील घोषणाबाजीवर नंतर बोलू, पण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री मांडीवर ‘थापा’ मारत मैदानात उतरले व थापांचा पाऊस पाडून निघून गेले. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी पाच-सहा हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातला एक रुपयाही अद्यापि मिळालेला नाही. जळगाव-सांगली महानगरपालिका निवडणुकांतही अशीच आश्वासने देण्यात आली', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मोदी समर्थक प्रश्न विचारणार्‍यांना देशद्रोही ठरवतात

2014 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी यांनी काय काय आश्वासने दिली होती? आकाशातील चंद्रतारेही ते लोकांच्या ओंजळीत ठेवणार होते. पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानच्या नकाशावर आणायचे वचन त्यांनी दिले होते. परदेशातील काळा पैसा परत आणू, इतकेच नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या खात्यात किमान पंधरा लाख रुपये टाकू असे वचन दिले होते. महागाई कमी करून लोकांना सुखाचे दिवस आणायच्या वचनाचे काय झाले, असे आता विचारले गेले तर मोदी समर्थक प्रश्न विचारणार्‍यांना देशद्रोही ठरवून मोकळे होतात. भ्रष्टाचारावर तर बोलायची सोय नाही.

मोदी यांनी हातात झाडू घेतला म्हणून देश स्वच्छ झाला नाही

पंतप्रधानपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत शपथेवर खोटे बोलणारे विराजमान होणार्‍या देशात निवडणूक सुधारणा व आचारसंहिता म्हणजे एक थोतांड म्हणायला हवे. ‘ज्याची लाठी त्याची म्हैस’, ‘ज्याच्या हाती ससा तोच पारधी’ यापासून निवडणूक आयोगही मुक्त नाही. पंतप्रधान मोदी यांनी हातात झाडू घेतला म्हणून देश स्वच्छ झाला नाही. कारण कचरा नसलेल्या रस्त्यावरच ते झाडू मारीत राहिले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी हा निशाणा साधला आहे.