शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे (Uddhav Thackeray Faction) असलेली सर्व मालमत्ता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आशिष गिरी नावाच्या वकिलाने ही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी विचारले की, ‘ही कोणत्या प्रकारची याचिका आहे आणि तुम्ही कोण आहात? तुमच्या विनंतीचा विचार केला जाऊ शकत नाही.’
शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष बाण हे शिंदे गटाला देण्यात आले आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत ठाकरे गटाच्या पक्षाची मालमत्ताही शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने याचिका वाचून ती तात्काळ फेटाळली. (हेही वाचा: उद्धव ठाकरेंना झटका! बारसू येथे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या 7 कार्यकर्त्यांना अटक)
सर्वोच्च न्यायालयाने 16 मार्च रोजी महाराष्ट्रातील राजकीय संकटाशी संबंधित उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांच्या क्रॉस-याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. सध्या तरी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिले असले तरी हा मुद्दा अजूनही न्यायप्रविष्ठ आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी 40 आमदारांसह भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही शिंदेंना दिले. त्यानंतर शिवसेना भवन आणि पक्षाचा निधी कोणाकडे राहील याची चर्चा सुरू होती. त्यावर शिंदे गटाने आपण यावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि पक्ष निधी ठाकरे गटाकडेच राहणार आहे.