राज्यपालांनी दिलेल्या वेळेत सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकली नाही. आणि या मागचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांचे पाठिंब्याचे पत्र वेळेत न मिळू शकल्याने हे घडले आहे.
काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही परस्परविरोधी विचारधारा असलेले पक्ष आहेत. तसं असूनही शिवसेनेने मात्र यापूर्वी तीन वेळा काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे (Shivsena Supporting Congress History).
बाळासाहेबांनी दिला होता इंदिरा गांधींना पाठिंबा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 31 ऑगस्ट 1975 रोजी ‘मार्मिक’ च्या अग्रलेखातून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. या अग्रलेखातून बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलं होतं की देशात अशांतता असल्यामुळे आणीबाणी लादण्याशिवाय इंदिरा गांधींकडे पर्याय नव्हता.
मराठी राष्ट्रपतींसाठी शिवसेनेचा पाठिंबा
2007 साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई पाटील यांच्याविरुद्ध भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार भैरोसिंह शेखावत होते. मात्र मराठमोळ्या प्रतिभाताईंनी शिवसेनेने पाठिंबा दर्शवला होता.
प्रणव मुखर्जींना पाठिंबा
2012 साली सुद्धा शिवसेना पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. एनडीएचे उमेदवार पी. ए. संगमा हे पराभूत झाले होते.
शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका; काँग्रेस नेते कपिल सिब्बल मांडणार शिवसेनेची बाजू
महाराष्ट्रात आता शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि उद्धव ठाकरे यांनी बळहेबांना दिलेला शब्द पूर्ण करता यावं यासाठी काँग्रेस देखील शिवसेनेला सत्ता स्थापनेत पाठिंबा देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल.