शिवसैनिकांनी राहुल गांधी यांना लगावला अप्रत्यक्ष टोला; त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पाठवले सावरकरांवरील पुस्तक

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे पडसाद फक्त राज्यातच नाही तर देशभरात उमटलेले पाहायला मिळाले. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परंतु, शिवसेना पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस वर त्यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी अप्रत्यक्ष रित्या राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सावरकरांवरील एक पुस्तक भेट दिलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला दिला होता. ते म्हणाले की काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना सावरकरांची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता काही शिवसैनिकांनी चक्क राहुल गांधी यांना सावरकरांवरील पुस्तक भेट म्हणून दिल्लीला पाठवलं आहे. त्यांनी सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पाठवले आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षातर्फे 14 डिसेंबर रोजी दिल्लीत भारत बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या रॅलीत, राहुल गांधी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ‘माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. मी सत्याच्याच बाजूने आहे आणि मी मरेपर्यंत माफी मागणार नाही’ असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आणि राहुल गांधी यांच्यावर विविध स्तरावरून टीका होण्यास सुरुवात झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवला बलात्कार प्रकरणातील नवा अहवाल; आरोपींना 100 दिवसांत फाशी देण्याची अहवालात असणार तरतूद

तसेच राहुल यांनी काही दिवसांपूर्वी भाजप सरकारवर निशाणा साधत भारतात ‘मेक इन इंडिया’ नसून ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर स्मृती इराणी आणि भाजप पक्षाने राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती.