महाराष्ट्रात मागील 18 दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्षाला आज शिवसेनेने एक वेगळे वळण देत राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. आज शिवसेना आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde), युवासेना अध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांची राजभवनावर भेट घेतली. यावेळी शिवसेनेने स्वतःच्या 58 आमदारांसहित सत्तास्थापनेचा दावा केला मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. अशातच राज्यपालांकडून शिवसेनेला देण्यात आलेला 24 तासांचा अवधी संपल्याने आता सेनेची देखील कोंडी झाल्याचे समजत आहे.
प्राप्त माहितीनुसार, काँग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) , माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या मतभेदांनंतर काही वेळापूर्वी काँग्रेसने शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजत होते. मात्र माध्यमांच्या माहितीनुसार अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये याविषयी चर्चा सुरूच आहेत असे दिसत आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनची सुरुवात केली आहे राजभवनाबाहेरच एकमेकांना पुरणपोळी भरवून आनंद साजरा केले जात असल्याचे समजत आहे.
ANI ट्विट
Aaditya Thackeray, Eknath Shinde and other Shiv Sena leaders meet Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan in Mumbai. #Maharashtra pic.twitter.com/EKWeO8URAz
— ANI (@ANI) November 11, 2019
दरम्यान, आज महायुतीतून पूर्णतः माघार घेत आता शिवसेनेने राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरावरून भाजपाची साथ सोडली आहे. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आजच सकाळी पत्रकार परिषदेत आपण पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. राज्यात आता पूर्णतः शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यास मुंबई महापालिका आणि विधानसभेतही भाजपाला विरुद्ध गटातच बसण्याची वेळ येऊ शकते.