आज विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून आता निकालाची आकडेवारी जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. परंतु निकाल येण्या आधीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून हवे असल्याची प्रतिक्रिया काही मुलाखतींमधून व्यक्त केली.
शिवसेना आणि भाजप महायुती सध्या एकूण 160 जागांवर आघाडीवर आहे. त्यातील 61 जागांवर शिवसेनेची आघाडी असल्याचे समजले आहे. पण संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
याआधीही संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील प्रवक्तेपदाची जबाबदारी काढून घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने बोलण्याऱ्या 18 प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती.
या यादीत अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, विशेषा राऊत, भावना गवळी, राहुल शेवाळे, धैर्याशील माने, अनिल परब, मनीषा कायंडे आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे. या नेत्यांसोबतच सुरेश चव्हाण, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्ग, किशोर कान्हेरे, शितल म्हात्रे आणि शुभा राऊल यांना पक्षाचे प्रवक्ते म्हणून माध्यमांशी बोलता येणार आहे. तसेच, एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही माध्यमांशी बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.