राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी बोलताना पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी मंत्रालयात भाषण करताना उद्धव ठाकरे अमृत महोत्सव हा शब्द विसरले होते. याच मुद्द्यावरुन नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीत टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले की, "देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे उलटली. हिरक मोहत्सव काय? जर त्या ठिकाणी मी असतो तर, कानाखाली चढवली असते. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवत आहे? हे कळतच नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे.” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- NCP Vs BJP: भाजपने काढलेली 'जन आशिर्वाद यात्रा' नसून 'जन अपमान यात्रा' आहे; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

"स्वत: स्वार्थासाठी हुजरेगिरीची सवय लागलेल्या नारायण राणे यांचे मानसिक संलुतन बिघडले आहे, असे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा शिवसेनेतील इतर कोणतेही नेते असो, त्याच्याबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्याचे हात छाटायची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे, हे विसरता कामा नये," अशीही संतप्त प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

"नारायण राणेंचा फुगा फुटलेला असून ते ऑक्सिजनवर आहेत. दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करण्यापलिकडे त्यांना कोणतेही काम राहिलेले नाही. उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेनेवर टीका करणे, हेच त्यांचे ऑक्सिजन आहे. त्यांनी टीका केली नाहीतर, त्यांचे मंत्रिपद जाणार. मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना हेच करावे लागणार आहे. यामुळे नारायण राणे काय करीत आहेत? याची आम्हाला अजिबात चिंता नाही," असे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.