वास्तुदोष कारण सांगून, म्हाडा लॉटरीत तब्बल 5.8 कोटींना विकले गेलेले सर्वात महागडे घर केले परत
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits- Facebook)

मुंबईमध्ये घर हे प्रत्येकाचेच स्पप्न असते. मात्र इथे घरांच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत, सर्वसामान्य व्यक्तीने कितीही हातपाय मारले तरी ही गोष्ट काही शक्य नाही. मात्र म्हाडा लॉटरीत तब्बल 5.8 कोटींना विकले गेलेले सर्वात महागडे घर विजेत्याने परत केले आहे. घरामध्ये वास्तुदोष आहे हे कारण सांगून त्याने हे घर परत केले आहे. विनोद शिर्के असे या व्यक्तीचे नाव असून, ते शिवसेनेचे आग्रीपाड्यातील शाखाप्रमुख आहेत. 2018 मध्ये उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडाने ही लॉटरी काढली होती.

या लॉटरीमध्ये विनोद शिर्के यांना दोन लागली होती, त्यातील नाना चौकातील धवलगिरी इमारतीतील टू बीएचके घराची किंमत 5 कोटी 80 लाख रुपये होती. मात्र जेव्हा त्यांनी त्यांच्या वास्तुविशारदाला ही दोन्ही घरे दाखवली त्यावेळी त्यांनी विनोद यांच्या राजकीय, सामाजिक, आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी घरामध्ये काही बदल सुचवले. मात्र हे 5.8 कोटी रुपयांचे घर पूर्णतः दोषी असून ते परत करण्याचा सल्ला दिला. (हेही वाचा: आचार संहिता लागू झाल्याने म्हाडा लॉटरीची तारीख पुढे ढकलली)

आता वेटिंग लिस्टवर असलेल्या इतरांना हे घर दाखवण्यात येणार आहे. दरम्यान म्हाडाच्या लॉटरीतून लागलेली ही दोन घरे शिर्के आणि त्यांच्या भावाच्या मालकीची असून, त्यांच्यात कायदेशीर लढा सुरू आहे. शिर्केंनी एक घर परस्पर म्हाडाला विकले आहे, पण त्याबाबत मला कोणतीही कल्पना दिलेली नाही असा आरोप त्यांच्या भावाने केला आहे.