Uddhav Thackeray VS Eknath Shinde: धनुष्यबाण वादावरुन उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक आयोगाला लेखी निवदेन, 'शिंदे गटाची कागदपत्रं मिळालीच नाहीत'
Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

धनुष्यबाण (Dhanushyaban) कोणाचा? या चर्चित वादाला प्रथमच कायदेशीर रेषा प्राप्त झाली आहे. शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा गट आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगासमोर प्रथमच हजेरी लावली. चिन्ह आणि पक्ष यासंबंधी वादावर सबळ पुरावे सादर करण्याबातब दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे दोन्ही गटांनी आपापल्या वकीलांच्या मार्फत लेखी निवदेनं सादर केली. उद्धव ठाकरे यांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पुन्हा एकदा मुदतवाढ मागण्यात आली. तसेच, शिंदे गटाकडून आवश्यक कागदपत्रे आम्हाला अद्यापही मिळाली नसल्याची माहितीही आयोगाला देण्यात आली. निवडणूक आयोगासमोर बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला दिलेली मुदत आज सपत होती. दरम्यान, पक्षावर अद्यापही आमचेच वर्चस्व आहे. त्यामुळे त्याबाबत सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासठी आम्हाला आणखी 15 चे 20 दिवस वेळ वाढवून मिळावा अशी मागणी ठाकरे गटने केली.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील चिन्हाबाबतचा वाद निकाली निघावा, अशी शिंदे गटाचा प्रयत्न आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचेच चिन्ह आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना ते नक्कीच वापरणार. त्यामुळे चिन्हाचा गैरवापर केला जाऊ शकतो, असे शिंदे गटाचे म्हणने आहे. शिवाय शिंदे गटाचा दावा आहे की, 40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी, 11 राज्यप्रमुख आपल्या बाजूने आहेत. 1 लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रंही शिंदे गटाने सादर केली आहेत. (हेही वाचा, Shiv Sena Election Symbol: धनुष्यबाण कोणाचा? शिवसेना निवडणूक चिन्हावर आयोग आजच घेणार निर्णय?)

दुसऱ्या बाजूला, उद्धव ठाकरे गटानेही जोरदार तयारी केली आहे. उद्धव ठाकरे गटानेही दावा केला आहे की, प्रतिनिधी सभेतले 70 टक्के सदस्य, 260 पैकी जवळपास 160 सदस्य आपल्या बाजूने आहेत. ठाकरे गटाने म्हटले आहे की, पक्षाच्या घटनेत प्रतिनिधी सभा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता आवश्यक कागदपत्रं सादर करण्यासाठी आम्हाला काही वेळ वाढवून हवा आहे. शिवाय शिवाय 10 लाख प्राथमिक सदस्यांची शपथपत्रंही निवडणूक आयोगाला सादर करण्याचीही तयारी उद्धव ठाकरे गटाकडून सुरु असल्याचे समजते. ठाकरे गटाने आपल्या वकिलामार्फत काही कागदपत्रं निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे समजते.