संजय राउत (Photo Credits- ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) वरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर जोरदार राजकीय हल्लाबोल केला. रशिया (Russia) मध्ये बनवलेल्या कोरोना लसीबाबत आपल्या वक्तव्याची सुरूवात करताना राऊत म्हणाले की, केंद्र सरकार योग्य दिशेने काम करत नाही. सतत आत्मनिर्भर (Aatmanirbhar) बनण्याचा आग्रह धरल्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारवर (Narendra Modi Government) टीका करत ते म्हणाले की, रशियाने कोविड-19 ची लस तयार करुन संपूर्ण जगासमोर ‘आत्मनिर्भर’ बनण्याचे पहिले उदाहरण मांडले आहे, तर भारत फक्त त्याबद्दल बोलतच आहे. विशेष म्हणजे कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून कोरोना लस संदर्भात देशात आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती दिली होती.

शिवसेना पक्षाचे मुखपत्र सामनाच्या साप्ताहिक स्तंभ 'रोखटोक' मध्ये, रशियाने लस तयार केल्याबद्दल राऊत यांनी राष्ट्राचे कौतुक केले आणि असेही म्हटले की ते महासत्ता होण्याचे चिन्ह आहे. ते पुढे म्हणाले, रशियाने जगासमोर मांडलेले उदाहरण हे भारतीय नेते मॉडेल मानणार नाहीत, कारण त्यांचे अमेरिकेवर प्रेम आहे. संजय राऊत असेही म्हणाले की, देशाचे केंद्रीय मंत्री पापड हा कोरोनावर प्रभावी उपचार सांगत आहेत आणि अशा गैरसमजांमुळे मोदी सरकारचे अर्धा डझन मंत्री कोरोनाला बळी पडले आहेत. राऊत यांनी, कोरोना कालावधीत रोजगाराच्या संधी कमी झाल्याने केंद्राच्या प्रयत्नांनाही लक्ष्य केले.

विशेष म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी जाहीर केले की कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी त्यांच्या देशाने जगातील पहिली लस तयार केली आहे, जी 'बर्‍यापैकी प्रभावी' आणि 'संसर्गाविरूद्ध कायमची प्रतिकारशक्ती' आहे. तसेच त्यांच्या एका मुलीला लसीकरण केल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत राऊत म्हणाले, 'जेव्हा रशियाची लस बेकायदेशीर आहे हे सिद्ध करण्याचा सर्वजण प्रयत्न करीत होते, तेव्हा पुतीन यांना मुलगी लसीकरण करून घेण्यास समोर आली. रशियाने जगभरात आत्मनिर्भरतेचे पहिले उदाहरण सादर केले आहे आणि आम्ही केवळ आत्मनिर्भरतेबद्दल बोलतच आहोत.’ (हेही वाचा: राहुल गांधींचा आरोप- भारतात Facebook, WhatsApp वर भाजपा-आरएसएसचे नियंत्रण आहे, पसरवतात खोट्या बातम्या आणि तिरस्कार)

राऊत म्हणाले, ‘दिल्लीत याआधी इतकी दहशत कधी नव्हती जितकी आता कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झाली आहे. यापूर्वी मोदी आणि शहा य्नाची भीती होती व आता लोक कोरोनाला घाबरत आहेत.’