Sanjay Raut Slams BJP: कोरोना विरुद्ध लढ्याला हिंदुत्वाशी जोडणारे लोकांचे शत्रू आहेत; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला टोला
Sanjay Raut (Photo Credit - PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोना संकटाने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. राज्यात मागीत काही दिवसांपासून दिल्लीसह महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील विविध मुद्यांवरून भाजप (BJP) नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘रोखठोक’मधून भाजपाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांवरून निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला भाजप विरोध करत आहे. तसेच कोरोना विरुद्ध लढ्याला हिंदुत्वाशी जोडणारे लोकांचे शत्रू आहेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपावाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपाने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही. छठपूजेसाठी समुद्रकिनारी एकाच वेळी हजारो लोक गोळा होतात. कोरोना संकटकाळात ते नियमबाह्य आहे. छठपूजा 20 नोव्हेंबरला पार पडली, पण गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच. मुंबईत ज्यांनी छठपूजेसाठी आंदोलन केले, त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे. हे देखील वाचा- Aaditya Thackeray: शिवसेना कधीही इतरांसारखे लोककल्याणाच्या कामांमध्ये राजकारण करत नाही; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विरोधी पक्षाला टोला

“भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील त्यांची भूमिका राष्ट्रीय हवी, पण तसे घडताना दिसत नाही. छठपूजा प्रामुख्याने बिहार पिंवा उत्तरेत केली जाते. मुंबईत हे लोण तसे अलीकडे आले. मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाचे नेते करतात. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजपा नेते कसे विसरतात? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, लोकांचे प्राण गेले तरी भाजपला राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करायचा आहे. महाराष्ट्रात भाजपला आणखी एक लॉकडाउन हवा असेल तर, ते राज्याचे दुर्दैव आहे. ज्यांना हिंदुत्ववादी विचारवंता व्ही.डी. सावरकरांना भारतरत्न देता आले नाही, ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नामकरण करण्याची योजना आखत आहेत. इतरांनी स्थापन केलेल्या संस्थांची नावे बदलण्याऐवजी आपला वारसा तयार करा. देशाची गेल्या सहा वर्षात निर्मिती झालेली नाही, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.