Shiv Sena: राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर चोपल्याशिवाय राहणार नाही- संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून खोचक प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना आमचे शाखाप्रमुख प्रत्युत्तर देतील असे म्हटले. मात्र ट्विटरवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत मात्र त्यांनी ''समजने वालों को इशारा काफी है....'' असे म्हणत 'महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे' असे म्हणत बाटगयांना हे कसे समजणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. नितेश राणे यांनी “शिवसेना भवन हे आता कलेक्शन सेंटर झाले आहे” असे म्हटले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना विचारले असता संजय राऊत यांनी म्हटले की, 'आजकाल काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवयच लागली आहे, असं मी कुठेतरी वाचलं. त्यामुळे या सर्व गोष्टींबाबत आमच्यापेक्षा आमचे शाखाप्रमुखच अधिक बोलतील,' असे संजय राऊत यांनी म्हटले. (हेही वाचा, Prasad Lad on Sena Bhavan: 'सेना भवन फोडणार' वक्तव्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांचा युटर्न)

काय म्हटले होते प्रसाद लाड?

“भाजपाची ताकद काय आहे हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिलं होतं. कारण, त्यावेळी जी भाजपा होती, भाजपाला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील भाजपा बरोबर आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपामध्ये आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद ही निश्चितच दुप्पट झाली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू.”