शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (रविवार, 29 मे) कोल्हापूर येथे शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले गेले. त्यातील तपशील मात्र बाहेर येऊ शकला नाही. प्रसारमाध्यमांशी बोलताना शाहू छत्रपती आणि संजय राऊत (Sanjay Raut Meet Shahu Chhatrapati Maharaj) यांनी राजकीय विषयावर बोलणे कटाक्षाने टाळले. छत्रपतींनी मौन बाळगणे बसंत केले. तर संजय राऊत यांनी या भेटीबाबत माहिती दिली. त्यात शाहू महाराज यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा झालेला फोनवरील संवाद आणि देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य यापलीकडे राजकीय तपशील फारसा नव्हता.
संजय राऊत यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात सांगितले की, शाहू महाराज हे आम्हा सगळ्यांपेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्यापेक्षा लहान आहेत. त्यामुळे आम्ही सर्वच जण त्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा महत्त्वाच्या मानतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही थोड्या वेळापूर्वी फोन होता. तेही महाराजांशी बोलले. ते जेव्हा कोल्हापूरात येतील तेव्हा शाहू महाराज यांची नक्की भेट घेतील, असे संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. छत्रपती घराणे आणि ठाकरे घराणे यांचे पूर्वंपारचे स्नेहाचे संबंध आहेत. ते राजकारणापलीकडचे आहेत, असेही राऊत या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Chhatrapati Shahu On Sambhajiraje: संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरुन शाहू छत्रपती यांचे खडेबोल, शिवसेनेच्या भूमिकेचेही समर्थन; फडणवीस यांच्याबद्दल गौप्यस्फोट)
ट्विट
श्रीमंत छत्रपती आदरणीय शाहू महाराज यांची आज कोल्हापूरच्या राजवाड्यात जाऊन भेट घेतली. दिलखुलास चर्चा झाली. शाहू महाराजांचे आशिर्वाद मोलाचे आहेत.. pic.twitter.com/z9nZApd5yV
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 29, 2022
दरम्यान, शाहू छत्रपती यांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्याचे वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले. उगाच अफवा पसरवू नका. शाहू महाराज हे अत्यंत ज्येष्ठ आहेत. त्यांना बोलताना किंवा त्यांच्याबाबत बोलताना खूप विचारपूर्वक बोलावे लागते. त्यामुळे त्यांना चुकीची माहिती कोण देणार? असा सवालही संजय राऊत यांनी या वेळी उपस्थित केला.