Lakhimpur Kheri Violence: चार खून पचवून जगातीला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला, लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी संजय राऊत यांची भाजपवर टीका
Lakhimpur Kheri Violence | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लखीमपूर खीरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence) प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत आहेत. देशात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला मुख्य आरोपी असलेला केंद्रीय गृहराज्यमंत्री अज मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा (Ajay Mishra) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना आक्रमक व्हावे लागले. काँग्रेस आणि देशातील राजकीय पक्ष जोरदार आक्रमक झाले. या सर्वांवरुन शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'रोखठोक' भूमिका मांडली आहे. दैनिक सामनामध्ये लिहिलेल्या 'रोखठोक' सदरात एका लेखात राऊत यांनी म्हटले आहे की, 'उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा आज कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचं काम प्रियांका गांधी यांनी केलं. इंदिराजींचं अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसलं.' दरम्यान, 'प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते' असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटलंय रोखठोकमध्ये

लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी भेटण्यासाठी निघालेल्या प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवलं. धक्काबुक्की केली. बेकायदेशीररीत्या डांबून ठेवलं. इंदिरा गांधींच्या नातीला, राजीव गांधींच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशानं पाहिलं. प्रियांका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं देशात अस्तित्व आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल, असे संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Bandh: 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र बंद'ची हाक; पत्रकार परिषदेत मांडले 'हे' मुद्दे)

आपल्या लेखात संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, प्रियांका गांधींना सीतापूरला जबरदस्ती डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियांका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियांका गांधींच्या एका झाडूने मात केली.