Maharashtra Bandh: 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र बंद'ची हाक; पत्रकार परिषदेत मांडले 'हे' मुद्दे
Sanjay Raut, Nawab Malik, Sachin Sawant (Photo Credits: Facebook/Twitter)

सोमवार, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) उपस्थित होते. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी भाजपवर (BJP) केला. दरम्यान, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. (Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेविरोधात महाराष्ट्र सरकारची 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक)

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या बंदात महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत. अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली. या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात येणार आहे. तसंच या बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे, असंही ते म्हणाले. तसंच हा बंद 100 टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नवाब मलिक म्हणाले की, लखीमपूरमध्ये इतका मोठा गुन्हा घडूनही पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत. शेतकऱ्याची हत्या करणारा मंत्र्याचा मुलगा फरार आहे. शेतकरी आंदोलनाला वर्ष लोटले तरी केंद्र सरकार त्यांच्याशी संवाद साधत नसून त्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हटले जात आहे. भाजप शेतकऱ्यांचे हित पाहणारा पक्ष नसून तो शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. आता तर भाजप शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीकाही नवाब मलिक यांनी केली.

"शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडणे ही मानवतेला कलंक लावणारी घटना आहे आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीला कलंकीत करणारे आहे," असे सचिन सावंत म्हणाले. ज्या पद्धतीने प्रियांका गांधी, राहुल गांधींना अडवण्यात आले ते पाहता देशात हुकुमशाही आली आहे, असे म्हणावे लागेल. त्याचबरोबर यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांवर दमनशाही केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.