
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रकृतीच्या कारणास्थव हिवाळी अधिवेशन सुरु असूनही सभागृहात दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपाकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या भाजप (BJP) नेत्यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सवाल विचारत पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीच प्रकृती सध्या बरी नाही. त्यामुळे ते सभागृहात येऊ शकले नाहीत. मात्र, ते कामकाजावर लक्ष ठेऊन आहेत. तसेच, अनेक महत्त्वपूर्ण निर्णयही घेत आहेत. येत्या एकदोन दिवसांमध्ये ते सभागृहातही येतील. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण तंदुरुस्त आहेत. तरीही ते संसदेत का येत नाहीत? असा थेट सवाल संजय राूत यांनी विचारला आहे.
आज भाजप नेते मुख्यमंत्र्यांच्या विधीमंडळातील उपस्थितीवरुन टीका करत आहेत. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरु असताना आम्हीही पंतप्रधानांना शोधत होतो. पण, आम्हला ते संसदेत न दिसता उत्तर प्रदेशात दिसले. कधी पुतीन यांना मिठी मारताना दिसले. इतक्या सगळ्या ठिकाणी ते दिसले पण संसदेत मात्र दिसले नाहीत. संसद जेव्हा सुरु असते तेव्हा पंतप्रधानांनी संसदेत यावे असा आजवरचा संकेत आहेत. या आधीच्या पंतप्रधानांनी ती परंपरा पाळली आहे. पण विद्यमान पंतप्रधान संसदेत येत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे काय ते दोन दिवसांमध्ये विधिमंडळात येतीलही. पण पंतप्रधान संसदेत का नाहीत येत? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (हेही वाचा, Sanjay Raut, Supriya Sule Dance Video: संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा फॅमेली डान्स; ‘‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ…” गाण्यावर थिरकले उपस्थित)
विरोधकांन जरा माणुसकी दाखवायला हवी. मुख्यमंत्री आजारी आहेत. ते बरे होत आहेत. त्यांना काही पथ्य होती. तीसुद्धा पूर्ण होत आहेत. मात्र, त्याला काहीसा अवधी लागत आहे. पुढच्या तीन-चार दिवसांमध्ये ते विरोधी पक्षांना दिसतील. ते सभागृहात नसले तरी कामकाजावर लक्ष ठेऊन आहेत. पण, विरोधी पक्षात असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी नजरच कमजोर झाली आहे. त्यामुळे त्यांना दिसत नाही. फारसे ऐकायलाही येत नाही. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे, गरज पडल्यास आम्ही त्यांना मदत करु, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.