शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर आपल्या 'रोखठोक' शब्दात इशारा दिला आहे. 'काहीही झाले तरी सरकार पडणार नाही आणि मीही झुकणार नाही, जय महाराष्ट्र' असे म्हणत संजय राऊतयांनी पलटवार केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर आरोप केला आहे. हा आरोप जम्बो कोविड सेंटर कंत्राटाबद्दल आहे. इतकेच नव्हे तर लवकरच शिवसेना खासदार संजय राऊत यांची रवानगी तुरुंगात होणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत बोलत होते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावरुन संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, 'गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. केंद्रीय एजन्सींचा केवळ गैरवापर केला जातो आहे. त्याआधारी अत्यंत खोटे पसरवल्याबद्दल आमची बदनामीही होत आहे. या 'सिरियल लबाडांना' लवकरच कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, याच ट्विटमध्ये संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, 'आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही. जय महाराष्ट्र!' . (हेही वाचा, Ajit Pawar On Kirit Somaiya: पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये काहीही गैर घडले नाही, अजित पवार यांचे किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर)
किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण केली. या कंपनीच्या आधारे त्यांनी मुंबईतील कोविड-सेंटर्समधील कामांचे कंत्राट मिळवले. ही जम्बो कोविड सेंटर्स दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील आहेत. यात संजय राऊत यांचे भागीदार असलेल्या सुजीत पाटकर यांनी कंत्राट मिळवले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी केली जावी असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.