Shiv Sena MP Sanjay Raut On Congress: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा काँग्रेसला सल्ला, 'आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या'
Sanjay Raut | (Photo Credits-ANI)

महाविकासआघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाने स्वबळाचा नारा दिल्यानंतर सहाजिकच शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (मस Uddhav Thackeray) यांनीही पक्षाच्या वर्धापण दिन सोहळ्यात बोलताना काँग्रेस पक्षाला कानपिचक्या दिल्या. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आज (रविवार, 20 जून) प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षाला खोचक सल्ला दिला. 'आगोदर गोंधळातून बाहेर या, आणि मगच स्वबळाचा निर्णय घ्या', असे राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळाची भाषा वापरत आहेत. कोणी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न. परतू, स्वबळाची भाषा करणाऱ्या पक्षातील एक नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. दुसरा म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार. त्यामुळे या पक्षाने आगोदर संभ्रमातून बाहेर यावे आणि मग नेमके काय करायचे याचा निर्णय घ्यावा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा आहे.

संजय राऊत यांनी सांगितले की, शिवसेना सर्व प्रकारे लढण्यास तयार आहे. मग ते स्वबळ, आत्मबळ अथवा कोणताही विषय असो. शिवसेना नेहमीच तयार असते. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कालच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील जनता आणि शिवसैनिक यांना दिशा दिली. त्यांनी दाखवलेल्या दिशेवरुन शिवसेना कोणतीही लढाई लढण्यासाठी तयार असल्याचेह संजय राऊत यांनी सांगितले. (हेही वाचा, Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका)

एएनआय ट्विट

दरम्यान, शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष काँग्रेसला जोरदार टोले लगावले. देशात कोरोनास्थिती गंभीर आहे. जनता अत्यंत अस्वस्थ आहे. अशा स्थितीत अनेक मंडळी स्वबळाचे नारे देत आहेत. लोकांची मानसिक स्थिती विचारात न घेता जर कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर लोक त्यांना जोड्याने हाणतील. लोक म्हणतील तुझे स्वबळ ठेव तुझ्याकडे. तुझी सत्ता आणि स्वबळ तुझे तुला लकलाभ. तू दुझं बळ वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार? असे असेल तर तुझी सत्ता तुझ्याकडेच ठेव आमच्या रोजीरोटीचे काय ते सांग? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षाला सूचक इशारा आणि कानपिचक्याही दिल्या.