काँग्रेसची जुनी 'खाट का कुरकुरतेय?', शिवसेना मुखपत्र सामना संपादकियातून टोलेबाजी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नाराजी आणि उघड वक्तव्यांवर शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना ( Daily Saamna) संपादकीयातून टोलेबाजी करण्यात आली आहे. काँग्रेस (Congress) काय किंवा राष्ट्रवादी (NCP) काय, राजकारणात मुरलेल्या शाहण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुररकुरायचे, कधी कुस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. परंतू, सत्तेचा अमाप लोभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही., खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये. आखाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवावी असा सल्लाही सामना संपादकीयातून देण्यात आाल आहे.

'खाट का कुरकुरतेय' या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीयात म्हटले आहे की, हे सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच शब्द अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधुनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. (हेही वाचा, Cyclone Nisarga: कोथरुडच्या उपऱ्या पाटलांनी बोंब मारली नाही असे सहसा घडत नाही; भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचे टीकास्त्र)

काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरने सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, सल्लाही सामना संपादकीयातून देण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घटक पक्षांच्या नेत्यांशी एक बैठक करणार असल्याचे समजते. ही बैठक स्वतंत्रपणे पार पडणार आहे. सुरुवातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत ही बैठक पार पडेल, असे वृत्त प्रसारमाध्यामांनी दिले आहे. या बैठकीत काय चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.