
शिवसेनेच्या आमदारांची अपात्रता बाबतची सुनावणी आज पार पडली. आज दुसर्या सुनावणीनंतर पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडली. 2023 च्या शेवटापर्यंत या प्रकरणाचा निकाल हाती येण्याची शक्यता धुसर झाली आहे. या प्रकरणामध्ये पुढे कागदपत्रांची पडताळणी करणं, आमदारांची साक्ष नोंदवणं आणि उलट तपासणी करणं हे टप्पे पार केले जातील मग निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला अजून 3-4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एकूण 34 याचिका आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी. कारण या सर्व याचिकांचा मुद्दा हा अपात्रतेचाच आहे. त्यामुळे सर्वांची सुनावणी एकत्र घ्यावी, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. पण त्यांच्या या युक्तिवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी नको, असं सांगत प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे आहेत आणि प्रत्येक याचिकेतील मुद्द्यांसाठी आमचे पुरावे देखील वेगवेगळे आहेत, असा युक्तिवाद समोरून करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यावेळेस राहुल नार्वेकर यांनाही कोर्टाला आतापर्यंत काय-काय झाले याचा तपशील द्यावा लागणार आहे. आज ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू यांच्यासह मुंबईतील आमदार उपस्थित होते. तर शिंदे गटाकडून अनिलसिंह साखरे यांनी बाजू मांडली.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर अत्यंत कडक शब्दात सुनावले होते. त्यानंतर सुनावणीसाठी वेग आला आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाकडून कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.