Sex | Representational Image | (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रातील शिवसेनेच्या (Shiv Sena) एका आमदाराला राजस्थानच्या भरतपूर येथील एका व्यक्तीने लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवले. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री भरतपूर येथील सिक्री येथून या गुंडाला अटक केली आहे. या पथकासोबत सिक्री पोलीस ठाण्याचे पोलिसही होते. सापळा रचून आमदारांना सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात अडकवले गेले होते. आता या आरोपीला मुंबईला आणले जात असून तिथे त्याची चौकशी होईल. यानंतर अन्य आरोपीही पकडले जातील. या प्रकरणात अडकलेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर हे मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघातील आहेत.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, मुंबईचे आमदार मंगेश कुडाळकर यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री एक मेसेज आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. कुडाळकर यांनी रिप्लाय केला व पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले. गप्पांमध्ये या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. आमदार मंगेश यांनी महिलेला मदत करण्याचे मान्य केले. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला. महिलेने सुमारे 15 सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.

व्हिडिओ कॉल कट होताच त्या व्यक्तीने आमदारांना एक अश्लील व्हिडिओ पाठवला. हा व्हिडिओ आमदाराचा व्हिडिओ होता, जो एडिट करण्यात आला होता. या व्हिडिओद्वारे आमदारांना ब्लॅकमेल करून 5 हजार रुपयांची मागणी केली. आमदार मंगेश यांनी फोन-पेवर त्या व्यक्तीला 5 हजार रुपये दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा ब्लॅकमेल करत 11 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर लगेचच आमदार मंगेश यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात सेक्सटोर्शनसह ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला. (हेही वाचा: मुंबईत बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला अटक, Honey Trap मध्ये उकळले कोटी रुपये)

त्यांच्या तक्रारीवरून, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मौसमदीनचा त्याच्या फोन-पे नंबरच्या आधारे शोध घेतला. यादरम्यान पोलिसांनी त्याचे लोकेशन जाणून घेतले. त्यावरून पोलीस भरतपूरला पोहोचले, तिथे त्यांनी सिक्री पोलिसांच्या मदतीने या व्यक्तीला ताब्यात घेण्याची योजना बनवली. रात्री अकराच्या सुमारास पोलिसांचे पथक सिकरीहून मौसमदीनच्या तेसकी गावाकडे रवाना झाले. त्याच रात्री मौसमदीन मोबाईलवर चॅटिंग करत असताना पोलिसांनी त्याला पकडले.