
Shiv Sena MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सलग पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दटावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी अखेर हे या प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक तरी निदान जाहीर केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणास वेग येईल. प्रकरणाचा निकाल काही जरी लागला तरी त्याचा राज्याच्या राजकारणावर निश्चित परिणाम होणार आहे. अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबत उद्धव ठाकरे गटाचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यानुसार सुनावणीचे तारीखनिहाय वेळापत्रक खालील प्रमाणे.
6 ऑक्टोबर 2023: एकनाथ शिंदे गटाचे वकील उद्धव ठाकरे गटाने 23 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर उत्तर/ म्हणने दाखल करतील.
13 ऑक्टोबर 2023: 'मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे' करण्यात आलेल्या मागणी अर्जावर दोन्ही पक्ष (ठाकरे, शिंदे) ' अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याऱ्या अर्जावर दोन्ही बाजूवर लेखी म्हणने मांडतील. 23 सप्टेंबर 2023 रोजी ठाकरे गटाने पिटीशन दाखल केली होती की, या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी एकत्र व्हावी.
13 ते 20 ऑक्टोबर 2023: अपात्रता सुनावणीदरम्यान विधानसभा सचिवालयात दाखल जालेल्या कागदपत्रांची आणि आदेशांची पाहणी करण्यासाठी, दोन्ही बाजूंच्या वकिलांना आवश्यक अवधी देण्यात येईल. म्हणजेच या काळात दोन्ही बाजूचे वकील ही कागदपत्रे अधिकृत पाहतील.
20 ऑक्टोबर 2023: 'मूळ शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे' 23 सप्टेंबर 2023 रोजी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष निर्णय आदेश जाहीर करतील. हा अर्ज अपात्रतेबाबतच्या सगळ्या पिटीशनची सुनावणी एकत्र व्हावी या या मागणीसाठी करण्यात आला होता.
27 ऑक्टोबर 2023: दाखल केलेल्या एकूण कागदपत्रांपैकी कोणती कागपत्रे अधिकृत मानावीत आणि कोणती नाकारावीत यावर दोन्ही पक्षांनी आपापले म्हणने सादर करावे. याचाच अर्थ असा की, त्या दिवशी केवळ कार्यालयीन प्रक्रिया पार पडेल. प्रत्यक्ष सुनावणीचे कामकाज होणार नसल्याचे दिसते.
6 नोव्हेंबर 2023: अपात्रतेचा निर्णय घेताना कोणते मुद्दे विचारात घ्यायला पाहिजेत यावर दोन्ही पक्षांनी आपले म्हणने लिखीत स्वरुपात सादर करावे. तसेच, परस्परांना त्याच्या प्रति द्यावात.
10 नोव्हेंबर 2023: अपात्रतेबद्दल कोणकोणते मुद्दे गृहीत धरावेत याबाबत विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतील.
20 नोव्हेंबर 2023: झालेल्या सुनावणीमध्ये प्राथमिक तपासणी घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपापल्या साक्षीदारांची यादी आणि प्रतिज्ञापत्र करावेत. याचाच अर्थ त्या दिवशीही कोणतीही कारवाई न करता केवळ प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
23 नोव्हेंबर 2023: या दिवसापासून उलटतपासणीस सुरुवात होईल. ज्यासाठी अध्यक्ष दोन्ही बाजूच्या वकिलांच्या सोयीनुसार तारखा देतील. शक्य झाल्यास एकाच आठवड्यात दोन वेळा उलट तपासणी घेण्यात येईल.
दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतल्यावर अंतिम सुनावणीसाठी दोन आठवड्यांनंतर निश्चित तारीख ठरवली जाईल. तसेच, वरील वेळापत्रकाबाबत कोणालाही विशेष अडचण नसल्यास तसेच कोणीही सुनावणी स्थगितीचा अर्ज दिला नसल्यास सर्व सुनावणी वेळापत्रकानुसार पार पडेल. मात्र, दरम्यानच्या काळात तारखांमध्ये काही बदल झाल्यास तसे कळवले जाईल, असे विधानसभा सचिवालयाने अध्यक्षांच्या वतीने आणि त्यांच्या सहीने कळवले आहे.