Sanjay Raut Criticizes Devendra Fadnavis: अहंकारी शब्दावरून संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला; काय म्हणाले? वाचा
Sanjay Raut, Devendra Fadnavis (Photo Credit: PTI)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi) सुरु असलेल्या वादात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारल्याने राज्यपालांना खासगी विमानाने प्रवास करावा लागला आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. याचमुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अहंकारी सरकार म्हणत राज्य सरकारवर टीका केली होती. या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहरादूनला जाणार होते. देहरादूनला जाण्यासाठी राज्यपाल मुंबई विमानतळावर पोहोचले असता उड्डाणाची परवानगी मिळाली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे राज्यपालांना पुन्हा परतावे लागले. याची माहिती होताच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर टीका केली. "सरकारी विमान ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही! राज्यपाल महोदयांना विमानातून खाली उतरवणे, इतका अहंकार महाविकास आघाडी सरकारमध्ये आला कुठून?" असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, “अरे बापरे…कोण कोणास म्हणाले? असा प्रश्न असायचा. येथे अहंकाराचा प्रश्न कुठे येतो? नियम पाळणे अहंकार आहे का? ज्याप्रकारे कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकार वागत आहे, तो अहंकार नाही? आणि नियमांचे पालन आहे. तर, मग राज्यपालांना नियमानुसार विमान मिळाले नाही हा अहंकार कसा असू शकतो?” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या सरकारी विमानास परवानगी नाकारली, बुकींग करुन खासगी विमानाने रवाना

मुख्यमंत्री कार्यालयाकडून बुधवारी रात्री उशीरापर्यंत राज्यपाल कोश्यारी यांना उत्तराखंड येथे जाणाऱ्या विमानाला उड्डाण करण्यास परवानगी दिली गेली नव्हती. त्यानंतर रितसर परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पत्र पाठवण्यात आले. पण, परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर सकाळी ही राजभवनाकडून यासंदर्भात चौकशी करूनच राज्यपाल यांनी विमानतळाकडे जाणे अपेक्षित होते. परंतु, राज्यपाल सकाळी थेट राजभवनातून निघाले आणि विमानतळावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.