Eknath Shinde And Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी हातमिळवणी करून राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर आपला हक्क सांगितला. हे प्रकरण आधी सर्वोच्च न्यायालयात व त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये पोहोचले. आता निवडणूक आयोगाने याबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. नुकताच भारताच्या निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोघांनाही शिवसेनेसाठी राखीव असलेले धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, दोन्ही गटांना सध्याच्या पोटनिवडणुकांच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवडून येण्यासारखी भिन्न चिन्हे दिली जातील. त्यानुसार, दोन्ही गटांना 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत याबाबतचा निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत. या सोबतच माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही गटांना शिवसेनेचे नावही वापरण्यात येणार नाही, असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे गटाची मागणी आहे की, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे संख्याबळ आणि समर्थनही नाही. त्यामुळे हा गट बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण वापरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तातडीने खातरजमा करुन निर्णय घ्यावा अशी शिंदे गटाची मागणी होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. त्याबाबत निर्णय आला आहे. (हेही वाचा: शिंदे फडणवीस सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड शिंदे गटात की ठाकरे गटात? संजय राठोडांच्या ट्वीटर अकाउंटवरुन राजकीय गोटात खळबळ)

दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाने आमदार रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा लट्टे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने या पोटनिवडणुकीसाठी बृहन्मुंबईचे नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे कॅम्पच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत. शिंदे गटाकडून अजूनतरी या जागेसाठी कोणतीही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.