गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची (Shiv Sena Dusshera Rally) चर्चा आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आता यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचाही दसरा मेळावा बीकेसी येथे पार पडणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी शिंदे गटाकडून सुरु आहे. या मेळाव्याला राज्यभरातून 3 लाख लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (एमपीसीसी) मंगळवारी मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.
राज्य काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी, अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभागाने या कार्यक्रमावर कथितपणे होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्प राज्याच्या विविध भागांतून राज्य परिवहन बस आणि खासगी बसमधून कार्यकर्त्यांना घेऊन येत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला 10 कोटी रुपये रोख अदा करण्यात आल्याचे माध्यमांतून समजते. त्याची मोजणी करण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले.
एवढी मोठी रक्कम शिंदे छावणीकडे आली कुठून? त्यांना हे पैसे कोणी दिले? एवढ्या मोठ्या रकमेचा व्यवहार रोखीने होऊ शकतो का? हे मनी लाँड्रिंग नाही का? असे प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या खात्यातून 10 कोटी रुपये भरले आहेत का, हे लोंढे यांना जाणून घ्यायचे आहे. यासोबतच या कार्यक्रमासाठी दोन लाख फूड पॅकेट तयार केल्याचे समजते, त्यासाठी देखील कोट्यावधी रुपयांचा खर्च केला गेला आहे. हे पैसेही कुठून आले? असे त्यांनी विचारले. (हेही वाचा: शिवसेना दसरा मेळावा, एक पक्ष दोन मैदानं; उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, मुंबईत रंगणार 'सामना')
शिंदे गटाची अजूनही अधिकृत नोंदणी झालेली नाही, त्यामुळे कुठल्या खात्याद्वारे या इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार झाला हे समजण्यासाठी याची चौकशी होणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार लोंढे यांनी केला. लोंढे पुढे म्हणाले की, जर ईडी आणि आयकर विभागाने तपास करण्यास नकार दिला तर काँग्रेस केंद्रीय तपास यंत्रणांकडे तक्रार दाखल करेल.