शिवसेना आणि शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra Melava 2022) कधी नव्हे तो इतका वेगळ्या अर्थाने गाजणार. शिवसेना दसरा मेळाव्याबद्दल पाठिमागीची अनेक वर्षे आकर्षण नेहमीच राहिलेले आहे. यंदा मात्र शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीमुळे शिवसेना मेळावा वेगळ्या अर्थाने चर्चेत असणार आहे. त्यामुळे 'एक पक्ष, एक झेंडा, एक नेता' या शिवसेनेच्या घोषणेला पहिल्यांदाच काहीसा धक्का बसताना पाहायला मिळतो आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखली शिवसेना दसरा मेळावा परंपरेने शिवाजी पार्क येथे होणार आहे. तर शिवसेनेतील फुटीर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. दोन्ही बाजूंकडून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आणि गर्दी जमविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर धडाडणार आहे. शिवसेनेत बंडाळी झाली असली तरी अद्यापही उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेने उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखली शिवाजी पार्क मैदानावर होणे अपेक्षीत होते. असे असले तरी, एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे की, खरी बहुमताच्या जोरावर खरी शिवसेना ही त्यांची आहे.प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेला परवानगी दिली. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो आहे. (हेही वाचा, 'उद्धव ठाकरे यांचा गट हा बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा व तीच ‘खरी’ शिवसेना'- NCP)
दुसऱ्या बाजूला, एकनाथ शिंदे गटाचा मेळावा बीकेसी येथे पार पडतो आहे. या गटाचाही दावा आहे की त्यांचा मेळावासुद्धा दसरा मेळावाच आहे. बीकेसी मैदानावरील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे. सांगितले जात आहे की, बीकेसीवरील दसरा मेळाव्यासाठी शेकडोंच्या संख्येने बसेस मुंबईत दाखल होणार आहेत. याशिवाय शिंदे गटाने तब्बल 10 कोटी रुपये राज्य परिवहन महामंडळाकडे जमा केलयाचे वृत्त आहे.
ठाकरे आणि शिंदे दोन्ही व्यक्तीमत्व सध्या राज्यातील प्रचंड वादळी ठरत आहेत. शिवसेना सावरण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्यावर आहे. तर गद्दारीचा डाग पुसून पणाला लागलेली प्रतिमा सावरण्याचे मोठे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. सध्या ते राज्याचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे राज्याचे लक्ष असते.