शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी तसं पत्र देखील काढलं आहे. शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची  कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होती. या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात त्यांचावर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी करत असल्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (हेही वाचा - Mumbai: राज्यात कॉलेज, पब आणि इतर ठिकाणी ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल; एकनाथ शिंदे यांची ग्वाही)

कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप चार दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. यामध्ये आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली, असं बोलताना यात ऐकू येत आहे. सोबतच धनंजय मुंडेंवर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबतचे वक्तव्य केल्याचंही यात ऐकू येत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर परळी आणि बीड पोलिसात गुन्हे देखील दाखल झाले होते.

कथित ऑडिओ कॉल वायरल प्रकरणी चर्चेत असलेले शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. आपल्याच पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.