महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवसातच विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होणार आहे. सारेच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. मात्र बदलापूरमध्ये आज शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद चव्हाटयावर आला आहे. या वादामधून शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडूनच तोडफोड केली आहे. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यातील वाद आज उफाळून बाहेर आला आहे. शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे हे आगामी विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा वाद चिंतेची गोष्ट ठरण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी वामन म्हात्रे आणि शैलेश वडनेरे यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पडसाद सभा संपल्यानंतर हमरीतुमरीवर आले. त्यामधून तोडफोडीपर्यंत हे प्रकरण गेले. मीडियारिपोर्ट्स नुसार शिवसेनेच्या वामन म्हात्रे समर्थकांनीच शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. सध्या तोडफोडीप्रकरणी बदलापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरापासून वामन म्हात्रे आणि शैलेश वडनेरे यांच्यात वाद सुरू आहेत. आता विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरूवात झाल्याने हा वाद प्रकर्षाने पुढे आला आहे त्यामधूनच ही तोडफोड झाल्याचे समोर आलं आहे.