शिवसेनमध्ये (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर आता पक्षांर्तगत अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' (Saamana) ची धुरा देखील पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या हाती घेतली आहे. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेंऐवजी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना हे पद देण्यात आले होते मात्र आता पुन्हा त्यांनी सामना ची सुत्र हाती घेतली आहेत. दरम्यान संजय राऊत यांनी ईडीने अटक केली असली तरीही त्यांना कार्यकारी संपादक पदी कायम ठेवण्यात आले आहे.
संजय राऊत कार्यकारी संपादक पदी असले तरीही त्यांना कोठडी मधून अग्रलेख लिहण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुख्य संपादक होत सामना च्या संपादकीय मधून उद्धव ठाकरे हेच टीकेचे बाण सोडणार असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांतील अग्रलेखांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा यांच्या टीकेचे बाण सोडले जात आहेत.
दरम्यान आज 'सामना'च्या इतिहासातील अजून एक नोंद घेण्यासारखी गोष्ट समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते आणि महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्तची जाहिरात सामनाच्या पहिल्या पानावर आहे. अशाप्रकारे शिवसेना पक्षाव्यतिरिक्त कुण्या नेत्याच्या वाढदिवसाची जाहिरात पहिल्यांदाच 'सामना' च्या पहिल्या पानावर झळकली आहे.
शिवसेनेमध्ये आता नेतृत्त्वामध्येही बदल होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना कार्याध्यक्ष पदी आदित्य ठाकरेंची नेमणूक करत उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्याकडे युवासेनेची धुरा देण्याचा विचार सुरू असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र अद्याप यावर शिवसेनेकडून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.