‘सामना’ च्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती, शिवसेना मुखपत्राच्या बनल्या पहिल्या महिला संपादक
उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे (Photo Credit: IANS)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची सेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या (Saamana) संपादकपदी नियुक्त करण्यात आले आहे. रश्मी ठाकरे आजपासून संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील. यापूर्वी खुद्ध उद्धव ठाकरे मुखपत्राचे संपादक होते, पण मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे यापूर्वी अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. संपादक हे पद लाभाचं पद असल्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी  येत असल्याने सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली आहे. क्रेडिट लाइनमध्ये आता रश्मी ठाकरे यांचं नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

रश्मी ठाकरे'सामना'च्या पहिल्या महिला संपादक ठरल्या. 90 च्या दशकात आपले विचार,राजकीय भूमिका महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 1988 मध्ये 'सामना' दैनिकाची सुरुवात केली होती. त्याच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांना पदाची जबाबदारी देण्यात आली. आणि आता त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.अनेक वर्षांपासून 'सामना'मधून शिवसेना राजकीय भूमिका, विचार प्रखरपणे मांडायची. यामधील लिहिले गेलेले अनेक लेख चर्चेचा विषयही बनले आहेत. भाजप सोबत सरकारमध्ये असल्यावरही देशातील अनके महत्वाच्या मुद्द्यावर पक्षाने 'सामना'मधून रोखठोक भूमिका मांडली आहे.

ठाण्याच्या डोंबिवलीत जन्मलेली रश्मी पाटणकर (ठाकरे) वाझे-केळकर महाविद्यालयातून पदवीधर झाल्या आहेत.रश्मी ठाकरे यांनी अनेकदा शिवसेनेच्या महिला विंग कार्यक्रमांना संबोधित केले आहे. उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची गाठण्यामागे रश्मींचे राजकीय कौशल्य हेदेखील एक मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.