मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते: संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी भलतं धाडस करुन नये, असा टोला भाजपला लगावतानाच पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असा पुनरुच्चार शिवसेना (Shiv Sena नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ठरवलं तर शिवसेना आवश्यक बहुमत सिद्ध करु शकते (Shiv Sena Can Prove Majority ) , असा थेट इशाराही राऊत यांनी भाजपला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी पवार यांच्यासोबत झालेली भेट राजकीय नव्हती तर, ती केवळ सदिच्छा भेट होती. राजकारण, समाजकारण, शेती आणि राज्यांतील विविध प्रश्नांसंदर्भात आपण पवार यांचे अनेक वेळा मार्गदर्शन घेत असतो, असे सांगत या भेटीतील तपशील सांगण्यास राऊत यांनी बगल दिली.

दरम्यान, अहंकार हा भल्याभल्यांना बुडवतो, हा इतिहास आहे, असा टोला लगावत युतीत आहात तर चर्चा सुरु का केली नाही, असा सवालही राऊत यानी भाजपला विचारला. महाराष्ट्रातील जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे राऊत यांनी या वेळी ठासून सांगितले. दरम्यान, भाजपने शिवसेनेला सत्तावाटपाचा नवा फॉर्म्युला दिल्या असल्याच्या वृत्ताकडे लक्ष वेधले असता, शिवसेना इथे व्यापार करायला बसली नाही. शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता, आणि शिवसैनिक व्यापारी नाही, अशा शब्दांत नव्या फॉर्म्युल्याच्या वृत्ताचे राऊत यांनी खंडण केले. (हेही वाचा, 'सत्ता'बाजारात आपला 'मटका' लागावा यासाठी सरकारकडून 'आकड्या'ची जुळवाजुळव; शिवसेनेचा भाजपला टोला)

दरम्यान, भाजपबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी सांगितले की, आम्ही केवळ राज्याच्या प्रश्नाचा विचार करतो. तो पक्ष (भाजप) आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राविषयीच्या प्रश्नांवर चर्चा करतो, असे राऊत म्हणाले. दरम्यान, भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता, राऊत म्हणाले जर त्यांच्याकडे 145 हा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी लगेच सरकार स्थापन करावे. जर, त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर, ते सरकार का स्थापन करत नाहीत, हे महाराष्ट्रालाच नव्हे तर, देशाला कोडं पडलं आहे, असा टोला राऊत यांनी या वेळी लगावला.