शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) महाराष्ट्रात आगामी निवडणुका एकत्र लढणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे यांनी आगामी निवडणुका आपण भाजपसोबत लढणार असल्याचे सांगितले. या भेटीचा फोटोही सीएम शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
ते म्हणाले, शिवसेना आणि भाजप आगामी निवडणुका- लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवतील, असे आम्ही ठरवले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना-भाजपची युती झाली आणि ती मजबूत आहे, असेही शिंदे म्हणाले. यापुढील काळातही आपण एकत्र निवडणुका लढवू आणि बहुमताने जिंकून महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी प्रयत्न करू. शहा यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान, कृषी व सहकार आदी विषयांवर चर्चा झाली. राज्यातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असेही शिंदे यांनी सांगितले. (हेही वाचा: माधवराव सिंधिया आणि लाल बहादूर शास्त्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, ही सरकार आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? संजय राऊत यांचा सवाल)
मुख्यमंत्री म्हणाले की, विविध प्रकल्पांबाबत आपण नेहमीच पंतप्रधान मोदींचा सल्ला घेतो. अमित शहा यांच्याशीही सहकार्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रातील शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना अमित शहा आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात ही भेट झाली. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. पवारांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः घराबाहेर आले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या भेटीवरून अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी शिंदे यांच्यासह अन्य 19 आमदारांनी (तत्कालीन अविभाजित) शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केले. या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पडले. शिंदे यांनी नंतर भाजपशी हातमिळवणी केली आणि ते मुख्यमंत्री झाले.