भाजपाला इंदिरा गांधी प्रिय झाल्याचा सर्वात जास्त आनंद: शिवसेना
Shiv Sena Attack On BJP Through The Mouthpiece Saamana | (Photo Credit: Archived, edited, representative images)

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि करीम लाला यांची कथीत भेट तसेच, उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानावरुन आक्रमक झालेल्या भाजपला शिवसेना मुखपत्र दै. सामना (Shiv Sena Mouthpiece Saamana) संपादकियातून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 'बाटग्यांची उठाठेव! फक्त विरोधासाठी विरोध' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात “भाजपाला इंदिरा गांधी प्रिय झाल्याचा सर्वात जास्त आनंद आहे. इंदिराजींच्या स्मृती कायमच्या मिटाव्यात असे ज्यांना वाटते त्यांनाच इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची काळजी वाटावी हे आश्चर्यच आहे,” असा टोला लगावतानाच “पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो,” अशी बोचरी टीकाही भाजपवर सामना संपादकीयातून करण्यात आली आहे.

सामना संपादकीयात शिवसेनेने भाजपवर अत्यंत तीव्र, सडेतोड तितक्याच आक्रमक आणि शेलक्या शब्दांत घणाघात केला आहे. “भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे आम्ही म्हणतो ते किती खरे आहे, याचे प्रत्यंतर आपल्या कृतीतून ते रोज देत आहेत. मूळ भाजप राहिला बाजूला, पण भाजपात घुसलेल्या इरसाल ‘बाटग्यां’नी ऊठसूट सिलिंडर वर करून ‘बांग’ देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. हे काही चांगल्या मानसिकतेचे लक्षण नाही. सत्ता हातून सटकल्याने निद्रानाशाचा रोग जडला हे समजू शकतो, पण त्या निद्रानाशातून त्यांना जे झटके व आचके येत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या इभ्रतीस तडे जात आहेत. इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राच्या इतिहासात निर्माण झाला नसेल, पण आधी अक्कल जाते व मग उरलेसुरले भांडवल जाते तसा काहीसा प्रकार सुरू आहे. सोयीनुसार टोप्या घालण्याचे व बदलण्याचे उद्योग सुरू झाले आहेत,” अशा शेलक्या शब्दात सामना संपादकीयांतून भाजपवर शरसंधान साधण्यात आले आहे.

दुसऱ्या बाजूला माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे कौतुक करत “शिवसेनेने सदैव इंदिराजींच्या महान व्यक्तिमत्त्वाचा व त्यांच्यातील मर्दानगीचा आदर केला. जेव्हा इंदिरा गांधींचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न झाला त्या त्या वेळी शिवसेना ढाल बनून मध्ये उभी राहिली. शिवसेनेने सोयीसाठी ना छत्रपती शिवरायांचा वापर केला, ना इंदिरा गांधींचा. इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व महान होते. त्यास तडे देण्याचे प्रकार मधल्या काळात सरकारकडून झाले. आता भाजपास वाटते की, इंदिरा गांधी यांचा अपमान झाला. त्यांना असे वाटणे हाच इंदिराजींचा सन्मान आहे. इंदिरा गांधी आज हयात नाहीत, पण त्यांच्या प्रतिमेचे भंजन करण्याचे उद्योग गेल्या पाच वर्षांत वारंवार झाले. इंदिराजी या शक्तिमान नेत्या होत्या. त्यांनी पाकिस्तानचे तुकडे करून फाळणीचा बदला घेतला”, असे सामनात म्हटले आहे. (हेही वाचा, देशी लेनने शिवरायांची अस्मिता पणाला लावली आहे, सुधीर मुनगंटीवार यांच्या बाळबोध प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदीच देतील: शिवसेना)

दरम्यान, उदयनराजे भोसले यांची कड घेऊन आक्रमक झालेल्या भाजपलाही सामनातून सुनावण्यात आले आहे. “पंतप्रधान मोदी या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास ‘पेढेवाले’ वगैरे थिल्लर उपमा देऊन त्यांचे हसे करणाऱ्यांच्या बाजूने संपूर्ण भाजप उभा ठाकला आहे. म्हणजे मोदी यांची तुलना सातारच्या पेढेवाल्यांशी केली हे भाजप नेतृत्वास बिनशर्त मान्य असेल तर प्रश्नच संपतो, पण राज्याच्या भाजप नेतृत्वाने एकदा तसे स्पष्ट करावे हे बरे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा फक्त स्वराज्यासाठी होता, स्वतःसाठी नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. शिवरायांनी मावळ्यांना स्वराज्याचे ध्येय दिले होते. जुलूमाविरुद्ध लढण्याचे धैर्य दिले होते. हे शिवरायांचे नाव घेऊन विरोधासाठी विरोध करणाऱ्यांनी विसरू नये. शिवराय जरा समजून घ्या इतकेच त्यांना सांगायचे आहे,” असेही सामनातून म्हटले आहे.