Shiv Bhojan Yojana (PC- PTI Wikimedia Commons)

शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शिवभोजन योजनेच्या पहिल्याच दिवशी लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. शिवभोजनाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 11, 274 थाळींची विक्री झाली आहे. सध्या राज्यात 125 केंद्रांवर शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक विक्री ठाणे (Thane) , नाशिक (Nashik) या भागांमध्ये झाली आहे. पहिल्या दिवशी नाशिक मध्ये 1000 तर ठाणे येथे 1,350 थाळ्यांची विक्री झाली आहे. तर यापाठोपाठ जळगाव, अहमदनगर, सोलापूर विभागात प्रत्येकी 700 थाळ्यांची विक्री झाली आहे. अवघ्या 10 रुपयात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे तूर्तास प्रत्येक जिल्ह्यासाठी 1,350 थाळ्यांचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.  शिवभोजन थाळी: तुमच्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मिळणार 10 रुपयांत जेवण

प्राप्त माहितीनुसार, या थाळीचा दर शहरात 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असेल. मात्र जनतेला यासाठी केवळ 10 रुपये मोजावे लागणार आहेत व उर्वरित रक्कम सरकारकडून अनुदान स्वरूपात देण्यात येईल. या थाळीमध्ये 2 पोळ्या , भाजी, भात आणि वरण असेल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती संपूर्ण योजनेचे निरीक्षण करेल. दुपारी 12 ते 2 या वेळेत ही थाळी उपलब्ध असेल.

दरम्यान, शिवभोजन योजनेला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या योजनेचा मुंबईत शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत महिलांच्या बचत गटांना काम देण्यात येणार आहे. एका केंद्रावर कमीत कमी 75 आणि जास्तीतजास्त 150  थाळ्यांचे वाटप होणे अपेक्षित आहे, असा सरकारचा सुरुवातीचा अजेंडा आहे.