शिर्डी साईबाबा मंदिरातील 'साईप्रसाद' पुन्हा सुरु; भक्तांना मिळणार मोफत लाडू
शिर्डी साई बाबा दर्शन (फोटो सौजन्य- फेसबुक)

शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा मंदिरातील (Saibaba Mandir) 'साईप्रसाद' भाविकांसाठी पुन्हा सुरु करण्यात आला आहे. साई मंदिरात प्रसाद म्हणून दिला जाणारा बुंदीचा लाडू भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र लॉकडाऊननंतर मंदिर सुरु झाल्यापासून हा प्रसाद बंद करण्यात आला होता. दरम्यान, आजपासून पुन्हा एकदा साईप्रसाद वाटपाला सुरुवात झाली आहे. आता दर्शन रांगेतच भाविकांना हा प्रसाद मोफत देण्यात येणार आहे. प्रत्येक भाविकाला 50 ग्रॅम वजनाचा एक लाडू मिळणार आहे.

कोविड-19 लॉकडाऊननंतर साईमंदिर खुले केले मात्र प्रसाद अद्याप सुरु करण्यात आला नव्हता. त्यामुळे साईप्रसाद सुरु करण्याची मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. त्यानंतर आता शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने हा प्रसाद लाडू पुन्हा सुरु केला आहे. दरम्यान, कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मात्र परिस्थितीनुसार त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील. (शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर आकारला जाणार; नगरपंचायतीकडून टोलवसूलीचा ठराव मंजूर)

दरम्यान, लॉकडाऊननंतर काही काळ खाजगी विक्रेत्यांकडून बुंदीचे प्रसाद लाडू तयार करुन घेतले जात होते. भाविक ते खरेदीही करत होते. मात्र आता पुन्हा एकदा साई संस्थानाने लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हा लाडू शास्‍त्रोक्‍त पध्‍दतीने तयार करण्‍यात येत असून त्याचा लाभ 24 तासांच्या आतच करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

1990 पासून साईबाबा संस्‍थानमार्फत साईप्रसादाची विक्री होत आहे. 2013 पासून हा प्रसाद मोफत दिला जाऊ लागला. मात्र कोरोना लॉकडाऊननंतर  सशुल्क आणि मोफत प्रसाद लाडू बंद करण्यात आले होते. मात्र भाविकांची मागणी पाहता पुन्हा प्रसाद सुरु करण्यात आला आहे.