शिवेसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या टीकेवर शरद पवार यांचा सवाल; ...मग पाच वर्षात शिवसेनेने काय केले? (Video)
Sharad Pawar (Photo Credits: Twitter)

दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dussehra Rally) पार पडला. दरवर्षी दसऱ्याला बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावरून शिव सैनिकांना मार्गदर्शन करीत असत. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही परंपरा सुरु ठेवली. कालचा दसरा मेळावा हा विधानसभा निवडणुक तोंडावर आली असताना आला होता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षांवर आपले टीकास्त्र सोडले. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी, ... मग पाच वर्षात शिवसेनेने काय केले? असा सवाल उपस्थित केला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामधील महत्वाचा भाग आहे. यावर्षी विधानसभेच्या रणधुमाळीत हा दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत केलेली युती कशी योग्य आणि फायदेशीर आहे हे स्पष्ट करताना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, त्यांनी जनतेला फसवले, खोटी वचणे दिली हे मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना ...मग शिवसेनने पाच वर्षांत काय केले? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे. याबाबत लोकमतने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. (हेही वाचा: शिवसेना दसरा मेळावा: राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने पहिल्यांदा आपला नेता ठरवावा- उद्धव ठाकरे)

बुधवारी सकाळी जळगावातील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उधव ठाकरे यांच्या सातबारा कोरा करू या घोषणेवर, आता माझा 7/12 कोरा झाला काय? हे मला घरी जाऊन पहावे लागेल' असा टोला लगावला.यावेळी त्यांनी पक्षातील लोकांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीवाराही भाष्य केले. राष्ट्रवादीने कोथरूड, त्यानंतर मुक्ताईनगर येथून अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनीही माघार घेतली आहे.