आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले. आंतरराष्ट्रीय स्टार्सने या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटी, खेळाडूंनी त्या विरोधात भूमिका घेऊन देशवासियांना एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) ट्विटवर भाष्य करत "आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.
पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी शरद पवारांना सचिन तेंडुलकरच्या ट्विटबाबत विचारले असता, "लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील" असे शरद पवार यांनी सांगितले आहे.हेदेखील वाचा- 'लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांसारख्या भारतरत्नांची प्रतिष्ठा सरकारने 'अशा' गोष्टींसाठी पणाला लावू नये'- राज ठाकरे
"इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत" असे शरद पवार म्हणाले.
भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले होते. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.