बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha Constituency) मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संभाव्य उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. या सर्व चर्चा आणि शक्यतांवर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यसभेवरील कारकीर्दीची साडेचारवर्षे शिल्लख असतानाही पक्षाने प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनाच पुन्हा उमेदवारी दिली याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह घड्याळ अजित पवार यांना मिळाल्यानंतर आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णयही विरोधात आल्यानंतर शरद पवार प्रथमच बारामती या आपल्या घरच्या मैदानावर दाखल झाले. या वेळी बारामतीकरांनी त्यांचे जोरदार स्वात केले. त्यांना भेटण्यासाठी बारामतीकरांनी मोठी गर्दी केली होती.
लोकशाही मार्गाने निवडणूक लढविण्याचा प्रत्येकाला हक्क
सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणूक 2024 मधील संभाव्य उमेदवारीबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. पण, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढविण्याचा हक्क आहे. त्यामुळे जर कोणी निवडणूक लढवत असेल तर त्याबद्दल विरोधाचे कारण नाही, असे पवार म्हणाले. या निमित्ताने पवार यांनी आगामी काळात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्या उतरल्या तरी लढण्याची तयारी असल्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले. (हेही वाचा, NCP vs NCP in Baramati: सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार देणार तगडा उमेदवार, अनुभव नसला तरी दिग्गजांचा पाठींबा)
भावनिक राजकारण करण्याचे कारण नाही
आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही. अनेक लोकांची आम्ही भाषणं ऐकतो. ते पाहता तेच भावनिक बोलताना दिसतात. कोणीकाहीही बोलले असले तरी, बारामतीच्या नागरिकांना चांगलेच माहिती आहे कोण भावनिक बोलतं. बारामतीमध्ये निर्माण झालेल्या संस्था एका रात्रीत तयार झाल्या नाहीत. त्या पाठिमागील अनेक वर्षांमध्ये तयार झाल्या आहेत. त्या संस्थांच्या स्थापना जाणून घेतल्या तरी ते लक्षात येईल, असेही शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, NCP MLA Disqualification Verdict: शरद पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटच 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस; राहुल नार्वेकर यांची घोषणा)
शिवसेनेप्रमाणेच विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
शरद पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय जो काही आला त्याबाबत आम्हाला आश्चर्य वाटत नाही. हा निर्णय शिवसेना पक्षाप्रमाणेच आला. जे त्यांच्यासोबत घडले तेच आमच्यासोबत. हा निर्णय पूर्णपणे संगनमताने घेण्यात आला आहे, अशी आमची भावना आहे. त्यामुळे त्याबाबत आवश्यक कायदेशीर पावले टाकत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे. (हेही वाचा, Supriya Sule Vs Sunetra Pawar: बारामतीमध्ये होणार नणंद-भावजय लढत? अजित पवार यांच्याकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारीची शक्यता)
प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीबद्दल आश्चर्य
प्रफुल्ल पटेल यांना कार्यकाळ बाकी असतानाही देण्यात आलेल्या राज्यसभा उमेदवारीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. पण, असे असले तरी एखाद्या सदस्याचा कार्यकाळ शिल्लख असताना त्याला पुन्हा अशा प्रकारे उमेदवारी देणे आश्चर्य वाटणारे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात फूट पाडली. जयंत पाटील यांनाही बाजूला करुन त्यांनाच चमकायचे आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याच्या कितीतरीवर्षे आगोदरपासून आव्हाड पक्षाचे काम करत आहेत. त्यांनी राज्य, आणि देश पातळीवर पक्षाची भूमिका मांडली आहे. नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याच अधिकार आहे. महत्त्वाचे म्हणजे आव्हाड यांनी कोणती भूमिका घ्यावी आणि काय बोलावे याबाबत इतरांनी सल्ला देण्याची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले.