Sharad Pawar On PM Modi's 'Wandering spirit' Remark: 'जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहीन'... PM Modi यांच्या 'भटकती आत्मा' च्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर
Sharad Pawar | (Photo Credit: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी काल पुण्यामध्ये एका प्रचार सभेमध्ये बोलताना शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांच्यावर निशाणा साधताना नाव न घेता त्यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' (Wandering spirit) असा केला आहे. यावरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार यांनी देखील मोदींच्या टीकेची दखल घेत, 'मोदी आजकाल माझ्यावर खूप नाराज आहेत. माझे बोट धरून ते राजकारणात आले आहेत, असे ते म्हणाले होते. आता तेच म्हणत आहेत की मी भटकता आत्मा आहे. होय, मी शेतकऱ्यांसाठी 'भटकता आत्मा' आहे, माझ्या स्वार्थासाठी नाही. माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगण्यासाठी मी भटकतो. सर्वसामान्य माणूस महागाईने हैराण झाला आहे, हे सांगण्यासाठी मी भटकतो.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, 'मोठ्या महत्त्वाकांक्षेसाठी ओळखला जाणारा महाराष्ट्रातील राजकारणी इतका अस्थिर झाला आहे की, तो राज्य आणि देश अस्थिर करण्याच्या तयारीत आहे. भटकत्या आत्म्याने हा खेळ 45 वर्षांपूर्वी खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री निवडून येईपर्यंत सत्तेत राहू शकले नसल्याचा ठपका शरद पवारांवर ठेवत पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला. नक्की वाचा: Sharad Pawar jibe Amit Shah: शरद पवार यांच्या गुगलीने अमित शाह बोल्ड; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवला.

शिरुरमध्ये आज अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. होय, मी भटकती आत्मा आहे. जनतेसाठी मी शंभरवेळा अस्वस्थ राहणार. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही' असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.

जे चांगले काम करतात, ते सत्तेचा दुरूपयोग करतात. मुळात सत्ता ही जनहिताच्या कामासाठी करायची असते, याचा विसर सत्ताधारी असलेल्यांना पडला आहे. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथं अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा हल्लाबोल पवार यांनी केला आहे.