राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आणि संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले. यामुळे विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील महिलेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घ्यावी असे सांगितले. मात्र त्यानंतर हळूहळू या प्रकरणाबाबत एक एक खुलासे होत गेले. त्यानंतर आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी या प्रकरणावर भाष्य केले. यामध्ये "जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्न येत नाही" असे त्यांनी सांगितले.
याबाब अधिक माहिती देताना शरद पवार म्हणाले, "राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी".हेदेखील वाचा- Sharad Pawar On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरूप गंभीर, पक्षातील इतर नेत्यांशी बोलून लवकरच निर्णय घेणार: शरद पवार
पोलीस विभाग चौकशी करेल. आमचं हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी. मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी”, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.
We have full faith in Mumbai police. Let them do their investigation first. Whenever the fact in the investigation will come out, we will think of probable action. I want that an ACP-level woman officer should investigate this case, to bring out the facts: NCP Chief Sharad Pawar https://t.co/5rNU7vCzvI
— ANI (@ANI) January 15, 2021
"मी काल बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं" असंही ते पुढे म्हणाले.
"गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं, पोलिसांनी खोलात जाऊन तपास करावा. सत्य जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागतं", अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
"भाजप नेते हेगडे आणि मनसे नेते धुरी ही एक दोन उदाहरण आली नसती तर वेगळा विचार केला असता, पण ही उदाहरणं आल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलीस तपास करतील. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत आम्हाला थांबावं लागेल", असं सांगत त्यांनी मुंबई पोलिसांवर विश्वास दाखवला.