Sharad Pawar On Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरूप गंभीर, पक्षातील इतर नेत्यांशी बोलून लवकरच निर्णय घेणार: शरद पवार
NCP Chief Sharad Pawar (Photo Credits PTI)

सध्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे नाव बलात्काराचे आरोप आणि परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध अशा दोन अत्यंत संवेदनशील विषयांमुळे चर्चेमध्ये आहेत. चारित्र्यावर गंभीर आरोप झाल्याने राजकीय व्यक्ती आणि पक्षाला मोठा फटका बसतो आणि त्यामुळेच आता एनसीपी पक्ष प्रमुख शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल काय निर्णय घेणार? याकडे सार्‍यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मुंबईतील वाय बी सेंटर नजीक आज पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरूप गंभीर असल्याचं म्हटलं आहे. सोबतच त्यांनी या प्रकरणाबदद्ल पक्ष म्हणून काही निर्णय घ्यावे लागतील आणि ते सहकार्यांशी बोलून एकत्रपणे घेतले जातील असे स्पष्ट केले आहे. Dhananjay Munde Allegation Case: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणी जंयत पाटील, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी दिल्या प्रतिक्रिया.

दरम्यान काल केवळ शरद पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये या बाबत बोलणं झालं आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी वैयक्तिक हल्ले होतील याचा अंदाज असल्याने पूर्वीच बॉम्बे हाय कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे न्यायलयीन गोष्टी आणि अन्य बाबींचा त्यांनी केलेला खुलासा, माहिती ही शरद पवार पक्षातील अन्य सहकार्यांसोबत शेअर करून पुढील निर्णय घेणार आहेत. आज एनसीपीची याबाबत महत्त्वाची बैठक होऊ शकते आणि त्यामध्ये पुढील निर्णय होणं अपेक्षित आहे.

सध्या धनंजय मुंढे राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा मीडियात रंगत आहे. पण अद्याप राजीनामा मिळाला नसल्याचंदेखील शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. तर धनंजय मुंडे हे नियमित कामाकाजाच्या वेळापत्रकानुसार पक्षकार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज ते 'जनता दरबार' मध्ये सहभागी होणार आहे. आरोपांबाबत पत्रकारांशी बोलणं टाळलं असलं तरीही त्यांनी शरद पवारांना स्पष्टीकरण दिले आहे आणि पक्ष पुढील निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान पोलिस स्टेशन मध्ये आज पीडीत महिलेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तर धनंजय मुंडे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळत हे ब्लॅकमेलिंग होत असल्याचं काही दिवसांपूर्वी फेसबूक पोस्ट द्वारा स्पष्ट केले आहे.