राज्याच्या राजकारणात सध्या काय सुरु आहे हे चक्क राज्याच्या राजकारणात असलेल्यांनाही सांगता येत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे कोण कोणास भेटतो, काय बोलतो, खासगी बैठकीत काय बलतो, जाहीर कार्यक्रमात काय बोलतो याकडे प्रसारमाध्यमांचे बारीक लक्ष असते. ते लक्ष एरवीही असतेच. परंतू, आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या दोन प्रमुख व्यक्ती जर परस्परांना भेटल्या तर त्याची अधिक चर्चा होते. आताही राज्यात अशीच एक चर्चा सुरु आहे. ही चर्चा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या भेटीची. ठाकरे यांचे निवास्थान 'शिवतीर्थ' येथे ही भेट घडल्याचे समजते.
देशमुख आणि ठाकरे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. मात्र, पडद्यावर काहीही घडामोडी घडत असल्या तरी पडद्यापाठीमागे बरेच काही घडत असल्याचे चित्र आहे. अनिल देशमुख हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये गृहमंत्री होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतरही अनिल देशमुख यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध काही काळापासून ताणलेले दिसतात. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राज ठाकरे सोडत नाहीत. त्यामुळे असे असतानाही अनिल देशमुख यांनी 'शिवतीर्थ' गाठल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सहाजिकच यातून राजकीय अर्थ काढले गेले नाहीत तरच नवल. सध्याची राजकीय परिस्थीती पाहता राज ठाकरे यांना महाविकासआघाडीमध्ये घेण्याच्या दृष्टीने तर प्रयत्न सुरु नाहीत ना? असाही सावल उपस्थित केला जातो आहे.