NCP (Photo Credit - Twitter/ANI)

केसीआर (KCR) यांचा भारत राष्ट्र समिती (BRS) हा पक्ष महाराष्ट्रात हातपाय पसरु पाहतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांना या पक्षाने भूरळ घातली आहे. अनेकांनी बीआरएसमध्ये प्रवेशही घेतला. पण, बीआरएसचा चंचूप्रवेश करण्याचा मनसूबा लक्षात आल्याने राज्यातील राजकीय पक्षही सावध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या रुपात याची प्रचिती नुकतीच आली. नागपूर (Nagpur) येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील रूपेश पन्नासे यांच्यासह आणखी काही पदाधिकाऱ्यांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आपले नेटवर्क सक्रीय केले आणि या नेत्यांशी संपर्क केला. त्यांचे मन वळवले आणि अवघ्या तीन दिवसांमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 'घरवापसी' (Ghar Wapsi) झाली. इतकेच नव्हे तर बीआरएस पक्षात गेलेल्या सुखदेव वंजारी यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु असल्याचे समजते.

दरम्यान, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिमागच्या वीस दिवसांपूर्वीच सोडचिठ्ठी दिली होती. लवकरच ते बीआरएसचा गुलाबी झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना थेट मुंबईला बोलावले आणि त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रवीण कुंटे यांच्या उपस्थितीत हबीब यांनी निर्णय फिरवला आणि थेट घरवापसी केली. अनिल देशमुख यांना समर्थन देण्यासाठी आपण पुन्हा राष्ट्रवादीत आल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Delhi Transfer-Posting Row: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची घेतली भेट)

बारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात जोर लावत आहे. बीआरएसच्या वर्धा येथील पक्ष कार्यालयाचे नुकते उदघाटन झाले. 15 जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमास खुद्द बीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आले होते. केसीआर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आतापर्यंत बीआरएसने तीन लाख सदस्यांची नोंदणी केली आहे. लवकरच ही नोंदणी 30 लाखांवर जाईल. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना या वेळी केसीआर यांनी पक्षात युवक आणि शेतकऱ्यांना संधी द्या, सर्वच जुने चेहरे घेऊ नका, असा सल्लाही दिला.