अहमदनगर: भाजपवाल्यांना दारात उभे करु नका; शरद पवार यांचे शेतकऱ्यांना अवाहन
NCP President Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Vidhan Sabha Election 2019: नोटबंदी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी संबंधित लोकांनी काळ्या पैशांची विल्हेवाट लावली. भाजप (BJP) सरकारला शेती आणि शेतकऱ्यांबाबत मुळीच अस्था नाही. या सरकारच्या काळात तब्बल 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे असताना आता या सरकारमधील लोक पुन्हा मत मागण्यासाठी दारात येतील. पण, आता भाजपवाल्यांना दारात उभे करु नका, असे शेतकऱ्यांना अवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रचारासाठी पवार नगर येथे आले होते. या वेळी पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांसमोर तडफदार भाषण केले. या वेळी पवार यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवलाच. परंतू, पक्ष सोडून गेलेल्यांवरही जोरदार टीका केली.

या वेळी बोलताना पवार म्हणाले, देशातील धनाड्य लोकांनी बँकांचे पैसे थकवले. पण, सरकारने याच धनिकांमुळे अडचणीत आलेल्या बँकांची 78 हजार कोटींची थकबाकी सरकारने भरली. शेती आणि उद्योगधंद्यांचे मोठे नुकासन आताच्या सरकारने केले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले. लोकंचे रोजगार बुडाले. भ्रष्टाचारातून मिळालेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. नोटबंदीच्या निर्णयानंतर सगळा देश पंतप्रधान मोदींनी बँकांच्या बाहेर उभा केला, या रांगात अनेक लोकांचे बळी गेले, पण नोटबंदीच्या निर्णयाचा काहीच फायदा झाला नाही, अशी तोफ शरद पवार यांनी डागली.

सरकारचे शेतीविषयीचं धोरण इतकं चुकीचं आहे की, आताचं ताजं उदाहरण घ्यायचं तर सरकारने कांदा निर्यात बंद केली. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली, त्यावेळी कांदा निर्यातबंदीचा निर्णय सरकारने घेतला, असे सांगतानाच आम्ही एकाच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पिकविम्याचा मोबदला मिळवून देत होतो. मात्र, आताच्या सरकारने अनेक कंपन्यांद्वारे पिकविमा काढूनही शोतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळत नसल्याचे पवार यांनी सांगितले. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2019: बंडोबांचे थंडोबा करण्यात सर्वपक्षीयांना अपयश; विदर्भात भाजप-शिवसेनेला अधिक फटका)

दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्यांची आपल्याला मुळीच चिंता वाटत नाही. खरे तर ते गेल्यामुळे आमचीही त्यांच्यापासून सुटका झाल्याचे सांगत शरद पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांवर टीका केली. दरम्यान पवार यांनी सरकारने वाट्टेल ते केल तरी काम करत राहणार असा निर्धार या वेळी व्यक्त केला. पवार यांच्या बोलण्याचा रोख या वेळी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीच्या मुद्द्यावर होता. या मुद्द्यावर बोलताना पवार यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, चिदंबरम यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांना तुरुंगात टाकले. आता हे लोन माझ्यापर्यंत आले आहे. पण, सरकारने काय वाट्टेल ते केले तरी काम करतच राहणार असल्याचे पवार यांनी या वेळी निक्षून सांगितले.