न्यायालयं, घटनेला न जुमानता समाजातील मुठभर लोकांच्या हितासाठीच देशात सत्तेचा वापर सुरु; शरद पवरांचे सरकारवर टीकास्त्र
शरद पवार, अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस (| (Photo Credits- Facebook )

देशाचे संविधान धोक्यात असून, न्यायालय, घटना, सीबीआय अशा कोणत्याच यंत्रणेला न जुमानता समाजातील मुठभर लोकांचे हित जपण्यासाठीच देशात सत्तेचा वापर सुरु असल्याची घनाघाती टीका राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात पवार पुणे येथे बोलत होते. या वेळी बोलताना पवार यांनी राज्य कुणाचंही असो पण त्याचा वापर जनतेच्या भल्यासाठी व्हायला हवा. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच लोक संविधानावर हल्ले करत आहेत. निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी यासाठी सीबीआय असते. सीबीआय एक स्वतंत्र यंत्रणा आहे मात्र त्याच्या प्रमुखांना घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांमार्फत घेण्यात आला. याने स्पष्ट होते की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असा या सरकारचा कारभार आहे, अशी टीका केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारवर केली.

पुढे बोलताना पवार म्हणाले, आजच्या राज्यकर्त्यांचा संविधानावर विश्वास नाही. केरळमध्ये सबरीमाला नावाचे मंदिर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मंदिरात रजस्वला स्त्रीयांना प्रवेशबंदी होती. काही स्थानिक महिलांनी याबाबतीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महिलांच्या बाजूने निकाल दिला आणि प्रवेशबंदी उठवली. या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहभाग असलेल्या केरळ सरकारने पुढाकार घेतला. मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शाह तिथे गेले आणि सांगितले की सुप्रीम कोर्ट असं निर्णय कसं घेऊ शकतं. अमित शाह यांनी घेतलेल्या ता भूमिकेमुळे स्पष्ट होते की न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय यांना मान्य नाही. स्त्रीपुरुष समानता यांना मान्य नाही. असे विचार असणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता असणे धोकादायक आहे. (हेही वाचा, २०१९मध्ये मोदींची खुर्ची जाणार, माझी भूमिका महत्त्वाची राहणार; शरद पवार यांचे भाकीत)

दरम्यान, आज स्त्रियांवर अत्याचार वाढत आहेत. सरकार काहीच करत नाही. आरक्षणावर गदा आणण्याचे काम सरकार करत आहे, ही चिंतेची बाब आहे. आज राज्यावर दुष्काळी संकट आले आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. शेकडो भगिनींना उन्हातान्हात पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. सर्व घटकांना दुष्काळाचा फटका बसतो मात्र महिलांना त्याची झळ जास्त बसते. सरकार अनुकूल निर्णय घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले की चारा छावण्या देणार नाही. आघाडी सरकार असताना आपण लागेल ती मदत शेतकऱ्यांना केली होती मात्र हे सरकार तसं करताना दिसत नाही. चारा नाही, पाणी नाही, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत, सरकारचे त्याकडे लक्ष नाही. हे सरकार सामान्य माणसाला कोणतेही सहाय्य करत नाही. अशा लोकांकडे असलेली सत्ता आपण लोकशाही मार्गाने हिसकावून घ्यायलाच हवी, असेही पवार आपल्या भाषणात म्हणाले.